'पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी दसरा'
लहानपणी दिवाळी म्हटले की फराळ बनवण्यासाठी सगळीकडे एका उत्साहात सुरवात होत असे. करंजी, लाडू, चिवडा, चकली असे ना ना विविध पदार्थांनी वाडा दरवळत असे. प्रत्येकाकडे जाऊन त्यांची चव पहाण्यात एक वेगळी मजा यायची. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करायचे, नाही तर नरकात जाल हं, असे आईचे शब्द अजुनही कानी ऐकू आल्यासारखे वाटतात. मग आम्ही सगळे भावंड पटापट ऊठून, बऱ्याचदा झोपेतच आंघोळीला जायचो. गरम गरम पाणी अंगावर पडल्यावर जे लख्ख डोळे उघडायचे. मग दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओरडत फुलबाजी घेऊन पळत सुटायची, मजा काही औरच.
जसे जसे मोठे होत गेलो, नोकरी निमित्त बाहेर पडलो. पण एक मात्र नक्की दिवाळीला एकत्र यायचे, असे आम्ही सगळ्या भावंडांनी ठरवले. आणि अजून देखील अंगणात बंब पेटवून पाणी गरम करण्यासाठी, वडिलोपार्जित बंब देखील तेवढ्यासाठी जपून ठेवला आहे. दिवाळी जवळ आली कि तो माळ्यावरून खाली काढुन, कोळसा आणून तो पेटवण्याची जी एक्साइटमेंट आत्ताच्या पिढीला दाखवताना त्यांच्या चेहर्यावरचे हावभाव टिपताना एक वेगळाच आनंद मिळतो. ही आपली एकत्र बांधून ठेवणारी संस्कृती आणि खाद्यसंस्कृती देखील विलक्षण आनंद देऊन जाणारी आहे.
सरते शेवटी मला काही ओळी लिहिल्या शिवाय रहावत नाही.
अभ्यंगस्नानाची मज्जाच न्यारी
दिमतीला असे बंबाची स्वारी।।
सकाळी सकाळी आई पेटवे बंब
मग आंघोळीला होई भराभर आरंभ।।
कोळसे,ढलप्या,भुसा त्याचा खाऊ
पाठोपाठ आंघोळीला जाई बहीणभाऊ।।
खालून काढा गरम पाणी
वरून ओता गार पाणी।।
कितीका येईनात पैपाहुणे
ह्याचे काम गरम पाणी देणे।।
अंगणात असे ह्याचे स्थान
तत्पर सेवा देण्यात हा महान।।
चकचकीत, तांबूस ह्याचे रूप
गरम गरम पाणी देई खूप।।
काळाच्या ओघात बंब पडला मागे
दिवाळीत त्याच्या आठवणीने हुरहूर लागे।
गिझर,हिटर ने घेतलीय त्याची जागा
बंबाची सर त्यांना येईल का सांगा।
सौ अर्चना दीक्षित
मुंबई